मिरगव्हाण येथे शेतकऱ्यांशी संवाद, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची डॉ. तानाजीराव सावंत यांची वचनपूर्ती
आरंभ मराठी / धाराशिव
बहुचर्चित, बहुप्रतिक्षित कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामातील काही भाग आता अंतिम टप्प्यात आहे. कामाची गती कायम राहिल्यास कृष्णेचे पाणी मराठवाड्यात लवकरच खळखळणार आहे. यासाठी पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांचा जोरदार पाठपुरावा सुरू असून, त्यांच्या प्रयत्नातून मराठवाड्याचे हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, कामाला अधिक गती यावी, यासाठी पालकमंत्री डॉ सावंत रविवारी दुपारी बंगाळवाडी येथील कामाला भेट देणार आहेत.यादरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी केले आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि अवर्षणग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरणार्या बहुचर्चित कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले असून, या प्रकल्पांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार आहे. बंगाळवाडी येथे मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शेवटचे ब्लास्टिंग झाल्यानंतर पाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या कार्यक्रमाला शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
निधीसाठी पाठपुरावा
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पहिला टप्प्यातील कामांना मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेत तब्बल 11 हजार 700 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला. याबाबतीत प्राधान्यक्रम बदलण्यासाठी मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन अग्रक्रमाने भूमिका मांडून प्राधान्यक्रम बदलून घेतला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला आता गती मिळाली. करमाळा तालुक्यातील जेऊर येथून पुढे धाराशिव जिल्ह्यात जाणारा 27 किमी लांबीचा हा बोगदा असून, आता जवळपास 25 किमी पर्यंतचे काम हे पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यातच उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर उजनीतील पाणी सीना- कोळेगाव धरणात यशस्वीरीत्या सोडणे शक्य होणार आहे.
दुष्काळी भागाला संजीवनी
योजनेच्या माध्यमातून 7 टीएमसी पाणी या बोगद्याच्या माध्यमातून सीना- कोळेगाव धरणात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार असून, अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतीला या प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहे. या सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत या प्रकल्पाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज हे काम प्रगतिपथावर असून, या महत्वपूर्ण कामाबद्दल डॉ. तानाजीराव सावंत यांचे आभार मानण्यात येत आहेत.