प्रतिनिधी / धाराशिव
श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयातील पाच विद्यार्थी जेईई मेन्स ऍडव्हान्स (आयआयटी) परीक्षेत पात्र ठरले असून,धाराशिव जिल्ह्यातील एकाचवेळी ५ विद्यार्थी आयआयटी साठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालकांसोबत सत्कार करण्यात आला. तसेच बारावी परीक्षेत वेगवेगळ्या शाखेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आजचा दिवस भाग्याचा असल्याचे सांगत संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा गौरव केला.
महाविद्यालयातील राजवीर लोमटे,समर्थ घोगरे, सुजित शिंदे,राधा सुपतगावकार आणि हर्षल ओहळ या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत यश संपादन केले असून, वैद्यकीय पूर्व परीक्षेत श्रेया कानडे, फैजान शेख हे पात्र ठरले असून, संस्थेच्या वतीने गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्राचार्य साहेबराव देशमुख,प्रा.संतोष घार्गे, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील,ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य आदी उपस्थित होते.
पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला,
यावेळी सुधीर पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षात संस्थेने वेगवेगळे उपक्रम राबविले.त्यामुळे नीट आणि जेईई संदर्भात चांगली प्रगती झाली आहे. गेल्यावर्षी संस्थेतील ५ विद्यार्थी डॉक्टर झाले होते. आयआयटीमध्ये मुले पात्र व्हावीत, अशी अपेक्षा होती, पालकांनीही यासाठी विश्वास ठेवून लातूरच्या कॉलेजला न पाठवता या संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. अभिमान वाटतो यावर्षी पाच विद्यार्थी आयआयटीमध्ये पात्र ठरले आहेत.आयआयटी झालेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत मेहनतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी अनुभवी टीमने मेहनत घेतली.
आपल्याला कारखाना तयार करायचा नाही
के टी पाटील यांचे उद्दिष्ट गरीब मुलांना घडवायचे स्वप्न होते, त्यासाठी संस्था उभारली आहे.लातूरमध्ये आता मुले घडविण्यासाठी कारखाना तयार झाला आहे. आपल्याला मुलांना उचित शिक्षण द्यायचे आहे.लातूरचे काही क्लासेसवाले कोट्यवधी रुपयांची जाहिरात करतात,मात्र आजकाल जाहिरातीचे युग आहे. लातूरला रहायचा खर्च वाढतो,दोन ठिकाणी घरे करावी लागतात,मात्र आपल्या संस्थेने कमी खर्चात अपेक्षित शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्यावर्षी लातूरचा निकाल लक्षात घेऊन काही मुले अकरावीनंतर पुन्हा आपल्या शहरात आली आहेत, त्या गुणवत्तेचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक सरस शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. दहावीला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे १२०० मुले आपल्या संस्थेचे असताना ९७ टक्के निकाल लागला होता. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील प्रगतीच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न आपली संस्था करते.संस्थेच्या नूतन शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी हजाराची वेटिंग यादी लागली आहे.हे गुणवत्तेमुळे घडते. आपल्याकडे प्रयोगशील शिक्षक आहेत. मेहनतीने शिकवतात,जगात काय सुरू आहे, याचा अभ्यास केला जातो.