मृत जनावरांच्या मुंड्या आणल्या, पिंपरी शिवारातील शेतकरी आक्रमक,
आरंभ मराठी / धाराशिव
तालुक्यातील पिंपरी शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला व गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर बंद झालेला जनावरांच्या हाडाच्या पावडरचा कारखाना पुन्हा एकदा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे पिंपरीसह परिसरातील गावकरी आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळपासून कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी मृत जनावरांच्या 400 ते 500 मुंड्या, हाडे, अवयव आणून टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच कारखान्यातील कामगारांना ताब्यात घेतले.
पिंपरी शिवारात मृत जनावरांच्या हाडांपासून पावडर तयार करण्याचा कारखाना गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. परिसरात दुर्गंधीचा त्रास होत असल्यामुळे पिंपरी तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी हा कारखाना गेल्या वर्षी बंद पडला होता. पोलीस प्रशासनानेही या कारखान्याला प्रतिबंध केला होता.
मात्र दोन दिवसांपासून हाडाच्या पावडरचा हा कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शुक्रवारी सायंकाळी या परिसरात मृत 400 ते 500 जनावरांच्या मुंड्या वाहनातून आणून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मृत जनावरांचे अवशेष, हाडे मोठ्या प्रमाणावर आणून टाकण्यात आली होती. शनिवारी कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांना पाचारण केले तसेच अशा पद्धतीचा कारखाना पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी पोलिसांकडे भूमिका मांडली.
यादरम्यान नागरिकांनी कारखान्याच्या कामगाराकडे हाडाच्या पावडरच्या कारखान्याच्या परवानगीची मागणी केली असता ते कोणतीही उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे दुर्गंधीचा दर्प आणणारे अशा पद्धतीचे लोकांच्या मुळावर उठणारे बेकायदेशीर कारखाने कसे सुरु होऊ शकतात, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली असून, पोलिस आणि जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते,याकडे लक्ष लागले आहे.