विक्रांत उंदरे / वाशी
तालुक्यातून गेलेल्या सोलापूर-धुळे महामार्गावर मोठे खड्डे व दबलेल्या खराब रस्त्यांचे बॅड पॅच मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. त्यामुळे वेगवान वाहनांना अचानक समोर खड्डे आल्याने वाहनाचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. परंतु सदरील महामार्ग दुरुस्तीकडे आयआरबीकडून दुर्लक्ष केले जात असून, रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
पारडी फाट्याजवळ असलेल्या सुदर्शन पेट्रोल पंपासमोर मोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणी खड्डे पडण्याची समस्या कायमची असून, या बॅड पॅचवर कायमस्वरूपी उपाययोजना आयआरबी कंपनीच्या वतीने केली जात नाही. वाहनधारकांच्या तक्रारी आल्यावर तात्पुरती थातुरमातुर डागडुजी करून खड्डे बूजवले जातात आणि महिन्याभरात पुन्हा त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडतात. महामार्गावर बहुतांशी ठिकाणी रस्ता दबून चरी पडल्या आहेत. यामध्ये दुचाकी स्लीप होऊन अपघात होणे नित्याचेच झाले आहे. तसेच रत्यावरील चरीत पावसाचे पाणी साचल्यामुळे लहान दुचाकी, चारचाकी गाड्याना धोका निर्माण होतो. पारडी, तेरखेडा या ठिकाणी महामार्गावर उड्डाण पुल बांधण्यात आले आहेत. उड्डाणपुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा खालच्या बाजूला निचरा होत नाही. परिणामी उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला पाणी साचल्यामुळे उड्डाण पुल उतरताना किंवा चढताना वाहन चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला जातो. त्यामुळे वाहन अनियंत्रित होण्याचा धोका असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महामार्गावरील खड्डे व बॅड पॅचची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
गाडी आढळून काच फुटली
महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज आला नाही. परिणामी खड्ड्यात अचानक गाडी आदल्यामुळे माझ्या गाडीची समोरची काच फुटली. त्यामुळे महामार्ग दुरुस्ती करण्याची नितांत गरज आहे.
– विजय घायाळ, वाहनधारक
महामार्गावरून धाराशिवकडे जाताना उड्डाणपुल सुरू होतो.त्या ठिकाणी खालच्या कडेला पावसाचे पाणी साचल्याने गाडीची स्टिअरिंग अनियंत्रित झाली होती. याची तक्रार आम्ही येडशी येथील टोल प्लाझावर सुद्धा केली होती. त्यामुळे उड्डाणपुल जवळ पावसाचे पाणी न साच्ण्याची उपाय योजना कराव्यात. –अतुल चौधरी, सरपंच, पारा,
आंदोलनाचा इशारा
महामार्गावरील खड्डे व खराब झालेल्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांनीही यागोदर निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. तेंव्हाही आयआरबीने रस्त्याची थातूरमातूर दुरुस्ती करून समाधान करण्याचा प्रयत्न केला होता. कायमस्वरूपी उपाययोजना मात्र केलीच जात नाही.