प्रतिनिधी / धाराशिव
जिल्ह्यात पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने यावर्षीही वृक्ष लागवड मोहीम सुरू झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे 2500 वृक्ष लागवड करून पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पर्यावरणाचा संदेश दिला.
जिल्हा पोलीस दल आणि कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्ट, तुळजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने भातंब्री आणि रायखेल डोंगरमाळावर 2500 वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, लिंब, चिंच, सिताफळ, गुलमोहर, पांगरा, बांबू, बदाम, अशा पर्यावरणपूरक एकुण 20 प्रजातीची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,(IPS), महिमा माथुर कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या तथा पर्यावरण तज्ञ, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी गणेश चादरे, कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.दयानंद वाघमारे, तुळजापूरचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, मुंडे, चास्कर, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार यादव, राउत, फुलसुंदर, सागर, पोलीस अंमलदार माळी, जाधवर मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिमा माथुर कुलकर्णी म्हणाल्या, निसर्ग हा मानवाशी जोडलेला आहे. मानव व निसर्ग एकमेकास पुरक आहेत. त्यासाठी आपण निसर्गची जोपासणा व निसर्गावर प्रेम केले पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे की विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून वृक्ष लागवड करत आहेत. ती भविष्याची गरज देखील आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आतुल कुलकर्णी म्हणाले की, आपला जिल्हा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने वृक्षारोपणाची मोहिम आखण्यात आली आहे. कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्ट व गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड शक्य झाली. आपण पुढे देखील अशाच प्रकारे वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करणार आहोत व ती आपली सर्वाची जिम्मेदारी आहे. तसेच वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. वृक्षारोपणासाठी भातंब्रीचे ग्राम पंचायत, इंदिरा कन्या हायस्कुल, मंगरुळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायखेल, यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. स्वागत डॉ. दयानंद वाघमारे तर सुत्रसंचालन मनोहर दावणे यांनी केले. तर कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर बनसोडे, स्नेहल पाटील,प्रदीप कांबळे, सोमनाथ लोहार,गंगाताई ननवरे, रवी भगत, अजित बनसोडे, राकेश जीटीथोर यांनी पुढाकार घेतला.