कळंब शहरात नव्या विक्रमाची नोंद, आमदार राणा जगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षकांची उपस्थिती
शाम जाधवर / कळंब
गेल्या आठ दिवसांपासून तयारीसाठी सुरू असलेली धावपळ, कुणी पर्यावरणाचं महत्व पटवून देत तर कुणी प्रत्यक्ष श्रमदान करून आपला सहभाग नोंदवित. मोहीम यशस्वी व्हावी यासाठी प्रत्येक जण धडपड करताना दिसत. अखेर तो क्षण आला आणि आज सकाळी कळंब शहरवासीयांनी आणखी एका विधायक उपक्रमातून विक्रमाची नोंद केली. एकाचवेळी 11111 झाडांची लागवड करून हरित क्रांतीच्या स्वप्नपूर्तीकडे शहरवासीयांनी पाऊल टाकले.
खरंतर एखादा प्रशासकीय अधिकारी आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडून सामाजिक कार्यात झोकून देणारा मिळाला तर त्या शहराचा किंवा त्या भागाचा कसा कायापालट होऊ शकतो,याचा प्रत्यय कळंबचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्याकडे पाहिल्यानंतर येतो. एम. रमेश यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प मांडला आणि सकल कळंबकरांनी त्यांना जोमाने साथ दिली. एकाच दिवशी एकाच वेळी ११,१११ वृक्ष लागवडीचे दिवा स्वप्न सगळ्यांच्या सहकार्याने, मेहनतीने आणि प्रयत्नांनी प्रत्यक्षात उतरले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरात वृक्ष लागवड उपक्रमाची लगबग सुरू होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एम.रमेश आणि कळंब शहरातील विविध संस्था, संघटनांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. दोन दिवसांपूर्वी शहरात जनजागृती वृक्ष दिंडी काढण्यात आली होती.
आज सकाळी लवकर वृक्ष लागवड मोहिमेसाठी विद्यार्थी, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक सज्ज झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी थांबून शहरवासीयांनी वृक्ष लागवड करून आपले योगदान दिले. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यामुळे शहरात विक्रम रचला गेला, शिवाय येणाऱ्या काळात शहर हरित होण्यासाठी मोठी मदत होणार आहे., छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, बी. बी. ठोंबरे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.स्वयंसेवकाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.
शहर आता विधायक मार्गावर
एका तपापूर्वी गुन्हेगारीची ओळख मिळालेल्या या शहरात आता विधायक उपक्रमातून नवनवे विक्रम रचले जात आहेत. हे सगळं सकल कळंबकरांच्या तीव्र इच्छा शक्तीनेच शक्य होत आहे.
■यापूर्वीही कळंबकरांनी वेगवेगळ्या उपक्रमातून एकजूट दाखवली. त्यात तालुक्याचे ठिकाण असूनही एक गाव एक गणपती हा उपक्रम कळंबकरांनी यशस्वी करून दाखवला होता.
■कळंब मधून जाणारी आणि ३ जिल्ह्यांची तहान भागवणारी नदी म्हणजेच मांजरा नदी. या मांजरा नदीच्या खोलीकरणामध्येही हिरीरीने सहभाग नोंदवून खोलीकरणाचे ऐतिहासिक काम केले होते.
■महाराष्ट्रातील बऱ्याच शहरातून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चे निघाले होते. या मोर्चाला केवळ पाठिंबाच नाही तर मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाज बांधवाना शहरवासीयांनी पाण्याची, चहाची, नाश्ताची सोय उपलब्ध करून दिली. जात-धर्माचा भेद न करता एकोप्याने नांदणारे कळंबकर एकत्र येत असतात.
निधीमध्येही सगळ्यांचा हातभार
आजच्या या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या जनजागृती साठी गुरुवारी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कळंब शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये आणि सकल कळंबकर मिळून जवळपास ३२०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
इतकी मोठी चळवळ म्हणजे निधीही मोठाच लागणार यात शंका नाही. सकल कळंबकरांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी आपापल्या परीने जमेल तसा निधी उपलब्ध करून दिला. यासाठी जणू सकारात्मक स्पर्धाच लागली आणि फक्त 15 दिवसांच्या आतच जवळपास 10 लाखांच्या पुढे लोकवाटा जमा झाला.
नवा आदर्श
आज ११,१११ वृक्ष लागवड करण्यासाठी कळंब शहर व परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, वकील, डॉक्टर, व्यापारी संघ, पत्रकार, विविध सामाजिक संघटना, आणि सकल कळंबकर यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.कळंबसारख्या एका तालुक्याचा हा आदर्श महाराष्ट्रासमोर प्रेरणादायी आहे.