सोमवारपासून अंमलबजावणी, जिल्हा रूग्णालयाने काढले आदेश
कर्मचा-यांच्या सुरक्षेसह उपचारातील अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी अंतर रुग्ण विभागात दाखल रूग्णांना भेटण्यासाठी आता रूग्णांच्या नातेवाईकांना पास दिले जाणार आहेत आणि एका वेळी एकाच नातेवाईकाला भेटण्यासाठी परवानगी मिळेल. पास जवळ असल्याशिवाय रूग्णांना भेटता येणार नाही तसेच रूग्णालयातील कर्मचा-यांनाही आता गणवेश, ॲप्रॉन, ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची सोमवारपासून म्हणजे 2 सप्टेंबरपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.तानाजी लाकाळ यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीवर अत्याचाराची घटना होती. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यायलातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.शासनाने वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेबाबत कडक धोरणे अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील अधिकारी, कर्मचा-यांना गणवेश,ॲप्रॉन, ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले असून,अनोळखी व्यक्तींना रोखण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनाही पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासंदर्भात धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयानेही संबंधित विभागांना शनिवारी आदेश जारी केले आहेत.त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
काय आहेत आदेश ?
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की,जिल्हा रूग्णालयात दाखल होणा-या रुग्णांची संख्या वाढली असून, रुग्णांसोबत नातेवाईकही मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच रुग्णांना भेटायला येणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी रुग्णालयातील वाढत्या गर्दीमुळे स्वच्छता कामात व रुग्णसेवा देण्यात अडचण निर्माण होत आहे. रुग्णसेवा सुरळीतपणे सुरु राहण्याच्या दृष्टीने गर्दीचे नियंत्रण करणे क्रमप्राप्त आहे.त्यामुळे 2 सप्टेंबरपासून रुग्णालयात येणा-या रुग्ण नातेवाईकांसाठी रुग्णालयातून दिलेल्या पास नुसारच प्रवेश देण्यात यावा. तसेच कर्तव्यावर उपस्थित राहतेवेळी रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी आय कार्ड व गणवेश (अॅप्रॉन) परिधान केले असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अन्यथा रुग्णसेवेमध्ये बाधा निर्माण झाल्यास आपणांविरुध्द प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणेला कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
–
एकावेळी एकालाच प्रवेश
जिल्हा रूग्णालयात प्रवेश देताना गर्दी नियंत्रित राहण्यासाठी प्रशासनाने एकावेळी एकाच नातेवाईकाला प्रवेश पास देऊन प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.