फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून उच्च स्तरीय चौकशी करा, सुरेश धस यांची शासनाकडे मागणी
आरंभ मराठी / धाराशिव
नगर पालिकेने नियमबाह्य पद्धतीने बोगस कामांची बिले काढली असून, याबाबत माजी आमदार सुरेश धस यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे याबाबत खुलासा मागवला. मात्र वारंवार पत्र देऊनही फड यांनी खुलासा न केल्यामुळे फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
धाराशिव नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगर परिषद अंतर्गत लेखासंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कार्यवाहीसाठी कामाचा छाननी तक्ता तयार करून बोगस बिले काढली असल्याची तक्रार माजी आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांच्याकडे केली होती.धस यांनी यांदर्भात शासनाकडे तक्रार केली म्हणून, त्यात म्हटले आहे की, मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड यांनी लेखसंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कारवाईसाठी छाननी तक्ता तयार करुन करोडो रुपयांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता चुकीच्या कामाची बिले अदा केल्याची तक्रार होती.
या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यानी मुख्याधिकारी वसुधा फड यांना पत्रव्यवहार करुन खुलासा मागितला. त्यानुसार संदर्भ क्रं ३ च्या पत्रानुसार विद्यमान मुख्याधिकारी यांनी मुदत मागितली व संदर्भ क्रं ४ च्या नुसार त्यांनी मुदतही दिली ती मुदत संपुनही अद्यापपर्यत खुलासा प्राप्त झाला नाही. ही गंभीर बाब असून, नगर परिषद प्रशासनानेही त्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्याची तसदी घेतली नाही. सबब खुलासा मी हा पावसाळी अधिवेशन कामकाजासाठी मागितला होता.
यावरून अशी धारणा झाली आहे की विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी जी बोगस बिले काढली आहेत त्यामध्ये तथ्य आहे किंवा त्या माझ्या तक्रारीला गांभीर्याने घेत नाहीत. मुख्याधिकारी यांनी काढलेल्या बोगस बिलाची उच्चस्तरीय समिती नेमून त्याची सखोल चौकशी करुन सर्व दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, ही चौकशी सुरू असेपर्यंत विद्यमान मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे,अशी मागणी माजी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.