प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, नागरिकांमध्ये संताप
आरंभ मराठी / धाराशिव
शहरातील नगरपालिकेच्या आवारातून कचरा जमा करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रेलरसह चोरी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या घटनेने नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरपालिकेच्या आवारातून यापूर्वी भंगार साहित्याची चोरी झाली होती. त्यानंतर हे प्रकरण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी मिटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा नगरपालिकेच्या आवारातून चक्क ट्रॅक्टर चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेच्या नाट्यगृहासमोरील मोकळ्या जागेत संबंधित ट्रॅक्टर चालकाने ट्रेलरसह कचरा गोळा करण्याचे ट्रॅक्टर लावले होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ट्रॅक्टर घेण्यासाठी आल्यानंतर चालकाला लावलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर नसल्याचे दिसून आले. त्यानंतर इतरत्र शोध सुरू झाला. दिवसभर संबंधित ठेकेदाराच्या लोकांनी ट्रॅक्टरचा शोध घेतला. मात्र ट्रॅक्टर व ट्रेलर दोन्ही आढळून आले नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी नगरपालिकेच्या आवारातून अत्यंत महागडे भंगार साहित्य चोरीला गेले होते. मात्र त्या साहित्याचा तपास लागला नाही. काही कर्मचाऱ्यावर तात्पुरती कारवाई करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी प्रकरण दडपून टाकले. एकीकडे नगरपालिका विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी गाजत असताना आणि पालिकेतील महत्त्वाच्या संचिका चोरीला गेलेले असताना आता ट्रॅक्टर चोरीला गेल्याने पालिकेच्या एकूणच भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षात नगरपालिकेत विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली असून, सध्याही पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल संशयाची सुई आहे. यापेक्षा पूर्वीचे अधिकारी बरे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एकंदर धाराशिव नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि चोरीचे लागलेले ग्रहण कधी सुटणार, असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे शहरात विकासाचा बोऱ्या वाजला असताना आहे ही नगरपालिकाही सुरळीत चालत नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.दरम्यान, चोरीच्या या प्रकरणात आधीच्या घटनेप्रमाणे पालिकेतील अधिकारी किंवा कर्मचारी गुंतलेले आहेत का, याचाही पोलिसांनी शोध घेण्याची गरज आहे.