लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवावी; आरंभ मराठीच्या मंचावरून व्यापाऱ्यांची अपेक्षा
आरंभ मराठी / धाराशिव
मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला आपला जिल्हा. एकीकडे सोलापूर, बार्शीसारख्या व्यापारी पेठा आहेत तर दुसरीकडे लातूरसारखा कृषी मालावर आधारित उद्योगांचा आणि शैक्षणिक केंद्र असणारा जिल्हा आहे. परंतु धाराशिवच्या बाबतीत हवा, पाणी आणि तुळजाभवानी एवढीच ओळख आजही सांगितली जाते. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही की उद्योगास पूरक वातावरण नाही. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग झाला, रेल्वे आली. परंतु उद्योग जगतावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. जिल्ह्यातील एमआयडीसीची अवस्था बकाल झाली आहे. उद्योग व्यवसाय नसल्यामुळे बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा धाराशिव शहरातील व्यावसायिकांनी ‘आरंभ मराठी’कडे व्यक्त केली.
आरंभ मराठी दैनिकाच्या माध्यमातून निवडणुकीच्या अनुषंगाने ‘व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि अपेक्षा’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी त्यांची मते मांडली.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास न झाल्यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. आमदार आणि खासदार यांनी विकासाचे व्हिजन ठेवून या क्षेत्रात काम केल्यास या भागातील उद्योगांचा विकास होईल असे यांना वाटते.
शहरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी देखील एका व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पहावी लागते. त्या शहरातील नागरिकांच्या आणि नेत्यांच्याही संवेदना बोथट झाल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या पायाभूत सुविधा उत्तम प्रकारच्या निर्माण केल्या तरच उद्योग आणि व्यवसायाचा विकास होण्यास वाव आहे, असेही मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
काय म्हणतात व्यापारी..?
मार्केट यार्डचा विकास गरजेचा,
जिल्ह्यातील मार्केट यार्डचा विकास झाल्याशिवाय उद्योग वाढीस चालना मिळणार नाही. आपल्या शेजारी असणाऱ्या बार्शी, सोलापूर, लातूर येथील मार्केट यार्डचा विकास झाला म्हणून ती शहरे पुढे गेली. आपल्या मागून लातूर शहर एज्युकेशनल हब बनले. आपल्या शहरात रस्त्यांची अशी दुर्दशा असताना आणि दोन वर्षांपासून स्ट्रेट लाईट बंद असताना एकही लोकप्रतिनिधी त्यावर बोलत नाही.
लक्ष्मीकांत जाधव,
जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ, धाराशिव.
–
उदासीनता असल्यामुळेच विकासाची वाढ खुंटली,
नेत्यांपासून जनतेपर्यंत उदासीनता असल्यामुळेच आपल्या शहराच्या विकासाची वाढ खुंटली आहे. पायाभूत सुविधा नसल्यामुळे नवीन उद्योग उभा राहू शकत नाहीत. आरोग्य सुविधांची आजही वानवा आहे. एखादा पेशंट थोडा सिरीयस झाला तरी त्याला शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात घेऊन जावे लागते. आपल्याकडे या सोयी अजून का नाहीत? हे प्रश्न राजकारण्यांना पडत नसतील का?
-अतुल अजमेरा, व्यापारी
–
विकासाची दृष्टी विकसित व्हायला हवी,
जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची विकासाची दृष्टी विकसित व्हायला हवी तरच बदल घडू शकतो. आपल्याकडून पुण्याला मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. इथला बुद्धिजीवी वर्ग बाहेर गेल्यानंतर विकास होणार कसा? हे स्थलांतर रोखायला हवे. परंतु इथे पायाभूत सुविधा नसल्यामुळे तरुण पुण्याकडे जात आहेत. अगोदर रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण सुधारले तरच पुढच्या गोष्टी होतील.
-अमित मोदाणी, उद्योजक
–
राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती हवी तरच बदल होईल,
कुठल्याही शहराचा विकास सहज होत नसतो त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असतात. असे प्रयत्न आपल्याकडे आजपर्यंत म्हणावे तितके झाले नाहीत. त्यामुळेच शहराची अवस्था बकाल झालेली आहे. इथे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी एका व्यक्तीचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहते. इथे मोठे बदल कसे घडणार? इथल्या लोकप्रतिनिधींनी विकासाची कामे केली तर पुढच्या निवडणुकीत त्यांना प्रचार करण्याची देखील गरज नाही पडणार.
-अझहर पठाण, व्यापारी
–
जनतेशी संवाद असावा
विकासकामे एकटा लोकप्रतिनिधी करू शकत नाही. त्याला जनतेची देखील साथ हवी. परंतु लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यामध्ये योग्य सुसंवाद घडला पाहिजे. हाच संवाद आपल्याकडे घडत नाही. फक्त व्यापारीच नाही तर शेतकरी, विद्यार्थी, महिला या सर्व घटकांशी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरच विकासाची कामे लवकर मार्गी लागू शकतात.
-रत्नदीप निकम, व्यावसायिक.