आरंभ मराठी / धाराशिव
धनगर समाजाला एस.टी.मधून आरक्षण देऊन अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे द्यावीत, या मागणीसाठी सोमवारपासून धनगर समाजाच्या चार बांधवांनी सुरु केलेले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण शिवसेना प्रवक्ते योगेश केदार, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रयत्नाने रविवारी दुपारी मागे घेण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपोषणाकर्त्यांनी त्यांच्या मागणीबाबत भ्रमनध्वनीवरून सकारात्मक चर्चा केली होती.मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक आठवड्यात बैठक लावून सकारात्मक मार्ग काढतो असे आश्वासन दिल्यानंतर धनगर बांधवांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश केदार, शिवसेना ओबीसी भटके विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनीही यावेळी या विषयावर शासनाकडून आलेल्या सूचनांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले. आम्हाला दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत, परंतु या विषयावर चालढकल करण्याचा प्रयत्न शासनाने केला तर पुढील उपोषण मुंबईत केले जाईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करताना दिला. या उपोषणाला सकल मराठा समाजासह सर्वच जाती धर्माच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जाहीर पाठींबा दर्शवला होता. सलग सात दिवसांपासून सलग उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता.अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण करणाऱ्या युवकांसोबत संवाद साधून यावर तोडगा काढून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.