धाराशिव येथे निषेधार्थ जोरदार आंदोलन
प्रतिनिधी / धाराशिव
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळणार्या धनगर समाजाच्या तरुणाला भाजपा शहराध्यक्ष आणि सुरक्षा रक्षकांनी केलेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ धाराशिव येथे रविवारी (दि.10) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर तत्काळ आरक्षण देण्याची भाषा करणार्या भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतरही आरक्षणाला बगल देत भंडारा उधळणार्या तरूणाला मारहाण करणार्या भाजपा शहराध्यक्षासह सुरक्षा रक्षकांचा निषेध करण्यात आली. तसेच संबंधितावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात बालाजी वगरे, सचिन देवकते, समाधान पडुळकर, शिवाजी पडुळकर, शम्सोद्दीन सय्यद, सुरेश वाघे, विद्याधर क्षीरसागर, किशोर डुकरे, संतोष दुधभाते, राजेश मेटकरी, काकासाहेब सोनटक्के, किरण महानुरे, अण्णा बंडगर, रमाकांत लकडे, बालाजी गडदे, अक्षय क्षीरसागर यांच्यासह सकल धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.