दोन गटात उमेदवारीसाठी चुरस, धीरज पाटलांचा नळदुर्गमध्ये तर चव्हाणांचा मंगरूळमध्ये संवाद मेळावा
मुज्जमील शेख / आरंभ मराठी
नळदुर्ग: नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांच्या वतीने रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीचा निष्ठावंतांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दांडी मारली. उलट मधकुरराव चव्हाण यांनी याच वेळेत मंगरूळ येथे आयोजित केलेल्या काँगेस कार्यकर्ता संवाद मेळाव्याला अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजीमध्ये चव्हाण यांचाच गट वरचढ ठरत असल्याची चर्चा आहे. दरम्यान,पक्षात उमेदवारीवरून दुफळी निर्माण झाली असून, दोन्ही गटाकडून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
रविवारी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे मधूकर चव्हाण यांनी तर याच वेळेत नळदुर्ग येथे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित केला होता. धीरज पाटील यांच्या मेळाव्याला निष्ठावंत असे नाव असे नाव देण्यात आले होते. आता निष्ठावान कोण आणि पक्षात सामील झालेले नवे कोण,असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. नळदुर्ग येथील मेळाव्याला नळदुर्ग शहर व परिसरातील मधुकरराव चव्हाण समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पाठ फिरवल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी व मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
जिल्हाध्यक्ष पाटलांनी आदेश देऊनही पदाधिकारी चव्हाणांच्या मेळाव्याला तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्यामुळे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यात आमदारकीच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातून काँग्रेस पक्षाच्या दोन गटात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी नळदुर्ग येथील स्थानिक कार्यकर्त्यांना नळदुर्ग येथे होणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याची पूर्व कल्पना दिली असताना सुद्धा नळदुर्ग शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरून मंगरूळ येथे मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यक्रमाला हजरी लावून आपण मधुकरराव चव्हाण यांचेच समर्थक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाचे तालुकाध्यक्ष तसेच काही प्रमुख पदाधिकारी पाटील यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. नळदुर्ग शहरातील काही माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक शहराबाहेर गेले होते.
चव्हाणांचा गट वरचढ
काही कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष कोणीही असो आम्ही मात्र तुमचेच समर्थक आहोत हे दाखविण्यासाठी नळदुर्ग शहरात असताना सुद्धा या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना फोन करूनही कार्यकर्ते फिरकले नसल्यामुळे काँग्रेसमध्ये चव्हाणांचाच गट वरचढ ठरतोय, अशी चर्चा आहे. तर कार्यकर्त्यांनी स्वतः या कार्यक्रमाकडे जाऊ नये, अशी तंबी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली की त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला, याविषयीची जोरदार चर्चा सुरू आहे.
मतभेद नाहीत
काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद किंवा मतभेद नाहीत. महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याकरिता निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सर्वांशी संपर्क साधण्यात आला होता.चव्हाण साहेबांचा कार्यक्रम होता.त्यामुळे ते येऊ शकले नाही तर काही जण काही कारणास्तव या कार्यक्रमाला पोहचू शकले नसतील. त्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी आहे, म्हणणे योग्य नाही.
ॲड.धीरज पाटील,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष