मुख्यमंत्री साहेबांचा ९ महिन्यांत तिसरा दौरा, सहा सभा: सर्वाधिक ३ उमेदवार, मात्र अंतर्गत गटबाजीचे काय
आरंभ मराठी / धाराशिव:
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमख एकनाथ शिंदे आज (दि.८) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते एकाच दिवशी जिल्ह्यात ३ ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. त्यांचा हा ९ महिन्यातला तिसरा दौरा आणि सहावी सभा असेल.जिल्ह्यात सर्वाधिक ३ मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे शिवसेना वाढीचे प्रयत्न असले तरी जिल्ह्यात पैसा संस्कृती आणि हिडीस राजकारणामुळे पक्षाला अंतर्गत जोरदार फटका बसत आहे. एकमुखी आणि सर्वसमावेशक नेतृत्व नसल्याने पक्षात ४ गट पडले आहेत. त्याचा परिणाम पक्षाच्या संघटनवाढीवर होत आहे. शिंदे गटातल्या एका बड्या नेत्याची शिवसेना उबाठा गटात प्रवेश करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, गुरुवारी कळंब येथील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे.
ज्यांनी शिवसेना वाढवली,त्यांचीच घुसमट
धाराशिव एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला जिल्हा. पक्षात निष्ठावावंतांची फौज होती.तुटक्या झोपडीत, फाटक्या कपड्यांवर राहणाऱ्या ध्येयाने, त्वेषाने भगवा खांद्यावर घेणाऱ्या शिवसैनिकांनी पक्षाला एकसंघपणे बांधून ठेवले होते. पैशांची मस्ती नव्हती की पक्षाशी बेईमानी.
अनेक आंदोलनात थेट रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या आणि शेकडो पोलिस केसेस अंगावर घेतल्या. तेंव्हा कुठे जिल्हा शिवसैनिकांचा बालेकिल्ला झाला.
काही वर्षांपासून सूत्रे बदलल्याने जिल्ह्यातील नेत्यांची घुसमट सुरू झाली.सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तक्रार पक्षातील निष्ठावान शिवसैनिक करू लागले. फाटक्या कपड्यातल्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या शिवसैनिकांच्या याच शिवसेनेत पैसा संस्कृती आली. कुणालाही पैशाने तोलण्याची भाषा सुरू झाली.
स्वाभिमानी मनाचे लचके तोडले जाऊ लागले.पक्षात परिवर्तन होत असताना अनेकांनी बाहेरचा रस्ता धरला. काहींनी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला जवळ केले तर काहींनी शांत राहण्याची भूमिका घेतली. भर सभेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, वर्मावर घाव बसतील, अशा शब्दांच्या उलट्या होऊ लागल्या.सभ्यतेच्या मर्यादा संपुष्ठात आल्या.
अशा राजकारणाची जिल्ह्यातील जनतेला बहुधा पहिल्यांदाच ओळख झाली होती.पण नेतृत्वाची वरपर्यंत मजल असल्याने आणि पक्षात पैसा संस्कृती जोर धरत असल्याने सर्वसामान्य शिवसैनिक हताशपणे,उद्विग्नपणे हे पाहत होता.
हीच का मुख्यमंत्र्यांची शिवसेना..?
अशा नेतृत्वाने जिल्ह्यातील शिवसेना संपवली की वाढवली, याचा शोध घेण्याची गरज आहे. वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना कधी अडगळीत टाकून, बेदखल करून, चालत्या गाडीतून खाली उतरवून अवमानित करण्याची नवी पध्दत पाहिल्यानंतर हीच का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची, स्व.दिघेंची शिवसेना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
जिल्ह्यातील..
शिवसेनेत आलेली ही भलती संस्कृती फार काळ टिकणार नाही,हा भाई उध्दराव पाटलांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपण जिल्ह्यात तीन उमेदवार उभे करून सर्वाधिक जागा जिंकण्याची मनिषा बाळगली असणार. यात आपल्या पक्षाला यश-अपयश किती मिळते, हे २३ तारखेला कळेल.
पण..
पक्षसंघटनेत चार गट का पडले, शिवसैनिकांना सर्वमान्य नेतृत्व का मिळत नाही, आयात उमेदवारांना संधी का दिली जाते,याचा नक्की विचार करा.हिडीस राजकारणामुळे नेते बाहेर पडत आहेत, कळंबमधून त्याची सुरुवात झाली आहे. अनेकांना आपल्या सेनेत यायचे आहे, ते का थांबले आहेत, याचाही शोध घ्यावा, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची अपेक्षा आहे.
एक पक्ष, चार गट, शिवसैनिकांची घुसमट
जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चार गट आहेत. मात्र या गटबाजीमुळे शिवसैनिकांची घुसमट होत आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षसंघटन वाढीसाठी यापूर्वी म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी ढोकीच्या कारखान्यावर सभा घेतली होती. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी परंडा, धाराशिवमध्ये कार्यक्रम घेतले. आता धाराशिव, परंडा तसेच उमरगा येथे सभा घेत आहेत.९ महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या ६ सभा होत आहेत.मात्र पक्षात गळती लागते की काय अशी परिस्थिती आहे.