प्रतिनिधी | सोलापुर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराचा आणि परिसरातील पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी कामात त्रुटी आढळल्याने मुख्यमंत्री शिंदेंनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं. वारकरी पंढरपुरात दाखल होण्याआधी सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आषाढी एकादशी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवण्यात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. तसेच पंढरपुरकडे येणाऱ्या रस्त्यांवर कुठेच खड्डे दिसले नाही पाहिजे सर्व रस्ते एक समांतर पातळीवर करा, रस्त्यात कुठेही कमी जास्त किंवा वर खाली स्तर नको. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंढरपुरात विकास कामांना कोणताही निधी लागला तर मी विशेष निधीची तात्काळ व्यवस्था करतो. पण कामं तात्काळ वेगाने पूर्ण करा. वारकरी पंढरपुरात दाखल होण्याअगोदर सर्व कामे युद्ध पातळीवर रात्र दिवस काम करून पूर्ण करा.
मुख्यमंत्री हे आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष अतिथी असतात. त्यांच्याच हस्ते विठ्ठलाची पूजा देखील केली जाते. असे असूनही त्यांनी थेट आषाढी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रविवारी (25 जून) रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचले. प्रथेप्रमाणे आषाढी सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 28 जून रोजी मुख्यमंत्री पंढपुरात दाखल होणार होते. पण तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे 27 जून रोजी पंढपुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचल्यामुळे राव यांचे गणित बिघडवल्याचं म्हटलं जात आहे.