चंद्रसेन देशमुख / धाराशिव
जेमतेम शिक्षण, इंग्रजीचे ज्ञान नाही की, परिचयाच्या व्यक्ती नाहीत. तरीही केवळ ८ डॉलर (६४ रुपये) घेऊन जपानमध्ये गेलेल्या धाराशिव येथील युवकाने टोकियोमध्ये स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले. व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांचे हे स्वप्न आता अपुरे राहिले असून, प्रदीर्घ आजाराने त्यांचे नुकतेच जपानमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या या बातमीने धाराशिवकरांना दुःख झाले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारे धाराशिव तालुक्यातील बेगडा येथील बाळासाहेब देशमुख यांचे जपानमधील टोकियो येथे नुकतेच निधन झाले असून, ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांनी टोकियोमधील बौद्ध मंदिरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात परत आणण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून लढा सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या गाठी-भेटी घेतल्या होत्या.
प्रतिकूल परिस्थितीत सोडला होता देश
शेतात चारण्यासाठी म्हशी घेऊन फिरणारा एखादा सामान्य कुटुंबातील मुलगा अन्य देशांत जाऊन मोठा व्यावसायिक होईल, यावर कदाचित कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र, बेगडा गावातील बाळासाहेब देशमुख यांनी हे करून दाखविले.ते वयाच्या २७ व्या वर्षी जपानला गेले. प्रचंड कष्ट करून त्यांनी स्वतःच्या मालकीचे हॉटेल सुरू केले आणि त्यांच्या जीवनात कायापालट झाला. अपार मेहनत करून त्यांनी दूरदेशात आपले नवे विश्व निर्माण केले. त्यांची मुले-मुली जगातील नामवंत विद्यापीठातून पदवीधर झाली आहेत.
संस्थेमार्फत प्रयत्न
आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर ते ज्या शहरात हॉटेल चालवत, त्या टोकियोमधील बौध्द मंदिरात असलेल्या नेताजींच्या अस्थी भारतात परत आणण्यासाठी त्यांनी लढा सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी इंडो- जपान फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली होती. नेताजींच्या अस्थीसाठी दोन्ही देशांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
धाराशिव लोकसभेची लढवली होती निवडणूक
बाळासाहेब देशमुख हे १९७० मध्ये मुंबईला गेले होते.तिथे त्यांची एका बौध्द भिक्षुकासोबत ओळख झाली. तेथून जपानला जाण्याचे स्वप्न मनात घोळू लागले. मात्र, त्यासाठी पैशांची गरज होती. त्यांची जिद्द, तळमळ आणि जपानमध्ये जाण्याची ओढ लक्षात घेऊन कुस्तीपद रंधावा यांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले. त्यांनी जालनामध्ये कुस्ती खेळून मिळालेले १२ हजार रुपये देशमुख यांना दिले, तिकिटाची रक्कम वगळता अवघे ६४ रुपये खिशात घेऊन देशमुख यांनी जपानला उड्डाण केले. तिथे टोकियोमधील रेनकोजी मंदिरात त्यांनी काही दिवस मुक्काम ठोकला. एका रेस्टॉरंटमध्ये भांडी धुण्याचे काम करून त्यांनी उपजीविका चालविली, काही दिवसांतच एका रेस्टॉरंट मालकाने कर्ज दिले आणि देशमुख यांनी स्वतःच्या मालकीचे रेस्टॉरंट सुरू केले. जीवनाला कलाटणी मिळालेल्या देशमुख यांनी जनसंघाकडून धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवली होती.