प्रतिनिधी / धाराशिव
शहरातील रस्त्यांची दैना कायम असून,ही संपण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) आक्रमक भूमिका घेतली आहे.रस्त्यांची दुरुस्ती, कचऱ्याची विल्हेवाट न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला देण्यात आला असून, त्यासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
मंगळवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकराज आहे. मात्र शहरातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक भागात नाल्यांची स्वच्छता दोन-दोन महिने केली जात नाही. त्यामुळे नाल्या तुंबून घाण पाणी रस्त्यावर येत आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने या घाणीमुळे शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही भागात तर नागरिक हाताने नाल्यांची स्वच्छता करत आहेत. ही बाब पालिकेच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. अनेक भागात कचरा घेऊन जाणार्या घंटागाड्या दोन-दोन महिने फिरकत नसल्याने शहरातील विविध भागात कचर्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे अनेक भागात कचर्याचे ढीग साचले आहेत.
नगर परिषदेचे जवळपास 20 सफाई कर्मचारी शासनाच्या व इतर विभागातील अधिकार्यांकडे काम करतात. अशा कर्मचार्यांना पुन्हा पालिकेत परत घेऊन त्यांच्यामार्फत सफाईची कामे करून घ्यावीत.त्याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालताना, वाहने घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील रस्तेकामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकारच्या दबावापोटी नगर परिषद प्रशासकाकडून रस्त्याची मंजूर कामे करण्यास टाळाटाळ केली जात असून, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. नागरी समस्या दूर करून जनतेच्या समस्या दूर कराव्यात. येत्या पाच दिवसांत नाल्यांची स्वच्छता करून कचर्याचे ढीग उचलण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, हनुमंत देवकते, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, रवि वाघमारे, पंकज पाटील, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, गिरीष पाळणे, शिवप्रताप कोळी, सुरेश गवळी, सतीश लोंढे, नीलेश साळुंके, नीलेश शिंदे, शिवयोगी चपणे व इतर शिवसैनिकांची स्वाक्षरी आहे.