आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद मागील दोन महिन्यांपासून रिक्त आहे. सप्टेंबर महिन्यात माजी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. भाजपकडून सध्या तीन इच्छुकांमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. दिनांक ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत नव्या उपनगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
या पदासाठी भाजपमधील इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी पक्षाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार, याबाबत शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
नगरपालिका प्रशासनाने उपनगराध्यक्ष निवडीसाठी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशनपत्रांचे वितरण व स्वीकारण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, दुपारी १ वाजता विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपचे अमित शिंदे यांची दावेदारी प्रबळ मानली जात असली तरी आकाश तावडे आणि अभिजित काकडे यांच्या नावांचाही विचार होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष कोणाला संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे.
भाजपकडून उमेदवाराच्या नावाबाबत सध्या कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याने निवडीच्या दिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे.
नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. आता ३ डिसेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत नव्या उपनगराध्यक्षाची निवड होणार असल्याने शहराच्या राजकारणात या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.










