आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. धाराशिवसाठी एक टीएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बोगद्याचे उर्वरित दहा टक्के कामही लवकरच सुरू होणार आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळू लागल्यानंतर मात्र विरोधकांना अचानक जाग आली असून, श्रेय घेण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी केली.
वर्षानुवर्षे तांत्रिक, कायदेशीर आणि आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या या प्रकल्पाला महायुती सरकारने गती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून प्रकल्पाला ११ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्याचबरोबर सुमारे चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाच्या कामांना चालना मिळाली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पातील तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर प्रयत्न करण्यात आले. सुधारित प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता आणि कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात त्यांच्या पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली.
आता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष मार्गी लागत असताना काही विरोधक श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. आजवर प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी नेमके काय प्रयत्न केले, कोणती मान्यता मिळवून दिली आणि किती निधी उपलब्ध करून दिला, याचा हिशेब त्यांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हान भोसले यांनी दिले.
दरम्यान, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिवसाठी एक टीएमसी पिण्याच्या पाण्याला मंजुरी दिली आहे. पुढील आवर्तनात घाटणे बॅरेजमार्गे हे पाणी रामदरा तलावात आणण्याचे नियोजन आहे. योजना क्रमांक दोनच्या पाचही टप्प्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून, पाणी आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
एकीकडे बोगद्याचे उर्वरित काम सुरू होण्याची तयारी, तर दुसरीकडे एक टीएमसी पाणी आणण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, अशा दोन्ही आघाड्यांवर प्रकल्प पुढे जात आहे. मात्र, अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याऐवजी त्यांना दिलासा देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी, असेही भोसले यांनी म्हटले आहे.
धाराशिवच्या विकासासाठी केवळ घोषणा करून चालत नाही, तर निर्णय, निधी आणि प्रत्यक्ष काम महत्त्वाचे असते. महायुती सरकारने या तिन्ही पातळ्यांवर काम केल्यामुळे कृष्णा-मराठवाडा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. डॉ. पद्मसिंह पाटील आणि जिल्ह्यातील जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होण्याच्या जवळ आले आहे. त्यामुळे श्रेयवादापेक्षा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन जनतेला पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. प्रकल्पासाठी कोणी काय केले, याचा निर्णय जनता घेईल. मात्र, अडथळे दूर करून प्रकल्पाला गती देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांची जनतेला जाणीव आहे, असे ॲड. भोसले यांनी स्पष्ट केले.










