आरंभ मराठी / धाराशिव
कळंब तालुक्यातील शेळका धानोरा ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामांवर खर्च दाखवून १४ लाख १३ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून तत्कालीन सरपंच सुवर्णा सुधाकर इंगळे आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश तुकाराम धावारे यांच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२३ ते दि. ७ जुलै २०२५ या कालावधीत शेळका धानोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा प्रकार घडल्याची फिर्याद आहे.
तत्कालीन सरपंच सुवर्णा सुधाकर इंगळे (रा. शेळका धानोरा, ता. कळंब) आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश तुकाराम धावारे (रा. गणेशनगर, कळंब) यांनी संगनमत करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी, नाली बांधकाम, नालीतील गाळ काढणे, सीसीटीव्ही बसविणे आणि शेतकरी सहल अशा विविध कामांवर खर्च दाखविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, या कामांसाठी खर्च झालेल्या १४ लाख १३ हजार १६३ रुपयांच्या रकमेचा विनियोग सादर न करता निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पंचायत समिती कळंबच्या सहायक गटविकास अधिकारी मनिषा वसंतराव सुकाळे यांनी दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.










