आरंभ मराठी / धाराशिव
मोबाईल शॉपीसह घरफोडीच्या घटनांचा तपास करताना धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुरूम येथील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावला. या प्रकरणी सोलापूर येथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सहा अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम आणि आरोपींचे मोबाईल असा एकूण १ लाख ४४ हजार ५८२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्यांत आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १५ ऑक्टोबर रोजी मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुरूम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानुसार साहिल सलीम जमादार (वय १९) आणि आकाश चंद्रकांत वाघमारे (वय २५, दोघे रा. साठे पाटील वरती, जुना देवगाव नाका, सोलापूर) यांना सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता मुरूम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली.
या कारवाईत चोरीस गेलेले सहा अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम तसेच आरोपींचे मोबाईल असा एकूण १ लाख ४४ हजार ५८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग समोर आला आहे. मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४ (१) व ३०५, तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक १९१/२०२६ अन्वये कलम ३३१ (४), ३०५ (अ) व ६२ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आवश्यक अहवालासह त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुरूम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण आणि चापोह रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.










