आरंभ मराठी / धाराशिव
ढोकी येथील जिल्हा फळरोपवाटिकेच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा चिघळला असून, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २२ जणांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी व रोपवाटिकेतील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत लक्ष्मण बारबोले (वय ५६, व्यवसाय कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटिका ढोकी, रा. बार्शी, जि. सोलापूर, ह.मु. ढोकी) यांनी २६ सप्टेंबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तोळाबाई बाबासाहेब चव्हाण, साखरबाई सुनील चव्हाण, शेवंताबाई रामदास चव्हाण, पिंकी महादेव शिंदे, गायाबाई बालाजी काळे, सखुबाई बजरंग चव्हाण, सविता भिमा काळे, लताबाई लाला काळे, जनाबाई दिलीप चव्हाण, सुमनबाई गोविंद शिंदे, पदमीनबाई दत्ता चव्हाण, रेखाबाई विलास चव्हाण, जनाबाई नवसाजी चव्हाण, मालनबाई बप्पा चव्हाण, लता वसंत शिंदे, मनिषा पप्पू चव्हाण, शाहुबाई बाबू पवार, सुनिता सुभाष चव्हाण, तोळाबाई नाना चव्हाण व अरुण चव्हाण, (सर्व रा. ढोकी, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास जिल्हा फळरोपवाटिका ढोकी येथे शासकीय कामकाज सुरू असताना संबंधितांनी रोपवाटिकेच्या परिसरात बेकायदेशीर अतिक्रमण करून तेथे प्रवेश केला. यावेळी कृषी अधिकारी शशिकांत बारबोले यांच्या शर्टला ओढून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्यांना कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप आहे. याशिवाय रोपवाटिकेत कार्यरत रखवालदार गजेंद्र परीट, गणेश गडकर आणि निलेश पुदाले यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी ढोकी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१(१), १३२, १८९(२), १९१(२), १९० व ३२९(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करीत आहेत. ढोकी येथील शासकीय रोपवाटिकेच्या सुमारे ४० एकर जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणावरून मागील काही काळापासून वाद सुरू आहे.
अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी ढोकी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. तसेच मोर्चाच्या माध्यमातूनही नागरिकांनी प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर तीन आठवड्यांपूर्वी पोलीस बंदोबस्तात शासकीय रोपवाटिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही या जमिनीवरून वाद कायम असल्याचे ताज्या घटनेवरून समोर आले आहे.
आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपामुळे या वादाला पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे.










