आरंभ मराठी / धाराशिव
“शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे… जय जवान, जय किसान… हक्क मागतोय, भीक नाही… सावित्रीबाई फुले यांचा विजय असो…” अशा घोषणांनी शुक्रवारी सकाळपासून धाराशिव जिल्हा परिषदेची इमारत दणाणून गेली. परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत मागील चार वर्षांपासून इयत्ता नववी आणि दहावीसाठी गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. गावात पहिली ते दहावीपर्यंत शाळा असूनही माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या विषयांचे नियमित अध्यापन मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापनाने अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांसह पालकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
सध्या इयत्ता नववीमध्ये ४० तर इयत्ता दहावीमध्ये ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता ३० विद्यार्थी आणि सुमारे ५० पालक जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली.
निवेदन दिल्यानंतरही पालक आणि विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. जोपर्यंत गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनामुळे जिल्हा परिषद कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आंदोलन अधिक तीव्र करत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारातच जेवण करण्यास सुरुवात केली. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.











