आरंभ मराठी | धाराशिव
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समवेत यंदाच्या मानाचे वारकरी म्हणून धाराशिव जिल्ह्यातील आणि कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माने (वय ७०) आणि प्रभावती माने (वय ६८) या वारकरी दांपत्याला महापूजेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. बऱ्याच वर्षांनंतर धाराशिव जिल्ह्यातील वारकरी दांपत्याला हा मान मिळाला आहे. शेतकरी असलेले बाबासाहेब व प्रभावती माने हे गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरची वारी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. महापूजेपूर्वी मध्यरात्री १२.४५ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले. त्यानंतर रात्री १ ते १.४५ या वेळेत मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते नित्यपूजा पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक मंदिरात दाखल झाले. पहाटे २.२० ते ३ या वेळेत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा, तर त्यानंतर ३ ते ३.३० या वेळेत श्री रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्पण केलेला बनारसी सिल्कचा लाल-केशरी रंगाचा पोशाख परिधान करण्यात आला होता. तर श्री रुक्मिणी मातेला लाल-हिरव्या रंगाची आकर्षक येवला पैठणी नेसविण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसर ‘पांडुरंग हरी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
महापूजेला पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
महापूजेचा मान मिळालेल्या बाबासाहेब माने व प्रभावती माने या दांपत्याला राज्य परिवहन महामंडळाकडून पुढील एक वर्ष राज्यभर एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. विठ्ठलभक्तीचा सन्मान म्हणून मिळालेला हा बहुमान धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.









