आरंभ मराठी / धाराशिव
बेंबळी रोडवरील मेडसिंगा पाटी येथे आज (दि.२५) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका बांधकाम कामगारासह एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, धाराशिव तालुक्यातील बरमगाव येथील कस्तुरा बलभीम पारवे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते.
बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी त्या एका बांधकाम कामगारासोबत दुचाकीवरून धाराशिवकडे जात होत्या. दरम्यान, बेंबळी रोडवरील मेडसिंगा पाटी परिसरात त्यांची दुचाकी आली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकी रोडवरून बाहेरच्या बाजूला फेकली गेली.
यामधे दुचाकीवरील बांधकाम कामगार उचलून दूरवर फेकला गेला. तर कस्तुरा पारवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बांधकाम कामगार आणि महिलेला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे बेंबळी रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.










