आरंभ मराठी / धाराशिव
ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी धाराशिव शहरातील एका डॉक्टरची तब्बल 63 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशिलकुमार शिवाजीराव सर्डे (वय 45, रा. समर्थ नगर, धाराशिव) यांना दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.44 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधिताने ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले.
सुरुवातीला कमी रकमेवर चांगला परतावा मिळाल्याचा भास निर्माण करून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत वेळोवेळी मोठ्या रकमांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या कालावधीत दिनांक 20 जानेवारी ते 9 मार्च 2026 दरम्यान विविध टप्प्यांमध्ये फिर्यादीकडून एकूण 63 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले.
नंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने आणि संपर्क कमी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्डे यांनी सोमवारी (दि.6) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम 2000 मधील कलम 66 (सी) आणि 66 (डी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणूक ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणतीही अनोळखी लिंक, मेसेज किंवा सोशल मीडियावरील गुंतवणूक योजना तपासल्याशिवाय स्वीकारू नये, असेही सांगण्यात आले आहे.









