आरंभ मराठी / धाराशिव
भागीदारीत सुरू केलेल्या पेट्रोलपंप व्यवसायात आर्थिक अफरातफर करून तब्बल ४ कोटी ४८ लाख ९४ हजार १४५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी विकास वल्लभदास कोंडेकर (रा. शिराढोण, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी सन २०१७ पासून ते जुलै २०२५ पर्यंत मे. सिद्धांत पेट्रोलियम लि., कळंब–परळी रोड, कळंब येथील पेट्रोलपंप व्यवसायात फिर्यादी सरस्वती आप्पासाहेब बोंदर (वय ५१, रा. शिक्षक कॉलनी, डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांना विश्वासात घेऊन भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता.
दरम्यान, पेट्रोलपंपाच्या खरेदी-विक्रीची नोंद, बँकेत जमा केलेली रक्कम, व्यवसायातील खेळते भांडवल (कॅश इन हॅन्ड), तसेच वही, खतावण्या, रोजमेळ आदी आर्थिक नोंदींमध्ये अफरातफर करून सी.ए. ऑडिटच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारात फिर्यादीची वेळोवेळी एकूण ४,४८,९४,१४५ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी सरस्वती बोंदर यांनी दिनांक २ मार्च २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम ३१६ (२), ३१८ (३) अन्वये कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.








