आरंभ मराठी / धाराशिव
नागपूर ते गोवा प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी (दि.1) कृषी दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील 19 गावातील दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली होती. यावेळी शेतकऱ्यांसोबत काँग्रेस, शिवसेना (उबाठा), स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाचे देखील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या अगोदर पोलिसांनी दोघांना नोटीस बजावली होती. मात्र बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
या शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहेत.