धाराशिव मतदारसंघातील ठाकरे गटाच्या नेत्याचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिंदे गटात प्रवेश, मुंबईत करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
धाराशिव: एक नेता, शेकडो गाड्या आणि पक्ष शिवसेना शिंदे गट. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटातल्या धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातल्या पक्षांतराच्या उंबरठ्यावर असलेल्या एका बड्या नेत्याचा अखेर पक्ष आणि प्रवेश निश्चित झाला आहे. हा नेता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करून पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हा प्रवेश सोहळा होत असून, त्यासाठी शेकडो गाड्यातून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत.
–
विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय गोटात नवनवीन हालचाली सुरू झाल्या आहेत. येणा-या काळात वेगवेगळ्या राजकीय पक्षात दररोज नवीन समीकरणे जुळवली जातील. त्याची सुरूवात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. आपले पक्ष मजबूत व्हावेत,यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील नेते कामाला लागले आहेत. त्यासाठी स्वतंत्र अस्तित्व असलेल्या किंवा मतांची मोठी ताकद असलेल्या नेत्यांचा पक्षात प्रवेश होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचा एक नेता शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागला आहे.
काही महिन्यांपासून पक्षांतराच्या उंबरठ्यावर असलेला हा नेता पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या माध्यमातूनच पक्षात प्रवेश करण्याच्या भूमिकेवर ठाम होता. अखेर डॉ.सावंत यांनी या नेत्याचे पक्षात स्वागत करण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या नेत्याचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. ४ किंवा ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करून हा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असून,या प्रवेशानंतर मात्र ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या पक्षांतराच्या उड्या सुरू झाल्या असून, महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक नेते वरिष्ठ पातळीवरील एकमेकांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे येणा-या काळात जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे वेगवेगळ्या प्रकारे बदलताना दिसतील, हे निश्चित.
–
पक्षांतराची खात्री, ठाकरे गटानेही पंख छाटले
धाराशिव विधानसभा मतदारसंघात काही प्रमाणात ताकद असलेला हा नेता शिंदे गटात जाणार असल्याची खात्री ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीपासूनच असल्याने ठाकरे गटाने या नेत्याच्या निकटवर्तीयांकडील पदे काढून घेण्याची सुरूवात केली आहे. नेत्याने पक्ष सोडल्यानंतर तालुक्याचे प्रमुख, कोणत्या गावच्या शाखेचा प्रमुख कोण, याची नावेही जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे पक्षांतराच्या उंबरठ्यावर असलेल्या या नेत्याचे पंख आधीपासूनच छाटली जात असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या सुधीर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.त्यानंतर बडा नेता शिंदे गटात दाखल होत असल्याने पक्ष नेतृत्वाने विधानसभा उमेदवारीचा शब्द नेमका कुणाला दिलाय, हे येणा-या काळात स्पष्ट होईल.