आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील तरुणांच्या मोटारसायकलला अपघात होऊन दोन तरुणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील नारी शिवारात घडली आहे. तरुण बार्शी येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तुळजापूर नाका पापनास नगर भागातील श्रीकांत मधुकर पोंदे (31),ज्ञानेश्वर शंकर देवकर (45) आणि खाजा नगर येथील फिरोज रब्बानी सय्यद हे तिघे घराशेजारी वास्तव्यास असलेल्या महादेव हरिश्चन्द्र जाधव यांच्या कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गुरुवारी दुपारी मोटारसायकलवरून बार्शीला गेले होते.
सायंकाळी धाराशिवकडे परतत असताना नारी शिवारात त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली.अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना पांगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र या अपघातात श्रीकांत पोंदे आणि ज्ञानेश्वर देवकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर फिरोज रब्बानी सय्यद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.याप्रकरणी उमाकांत पोंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.