प्रतिनिधी / धाराशिव
येथील श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्पाचे संचालक प्रा.ज्ञानेश्वर राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या फोटॉन व फेनोमेनॉल बॅचमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, सामाजिक भान ठेऊन सामाजिक कार्यास स्वतःला कसे वाहून घ्यावे तसेच तरुणांनी व्यवसायाकडे वळावे, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उदबोधनपर कवितांचे वाचनही केले. श्री. राऊत यांनी आतापर्यंत त्यांच्या प्रकल्पातून घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकुण ३०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत असल्याचे सांगितले. त्यांनी अनेक आत्महत्याग्रस्तांच्या पाल्यांना, अनाथ मुलांना, ऊसतोड कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण दिलेले आहे. तसेच त्यांनी पर्यावरण, पाणी व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या स्वरूपाची कामे केलेली आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे यांनी भूषविले. कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.एन.आर.नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुजारी यांनी केले तर आभार विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा.टी.पी. हाजगुडे यांनी मानले. यावेळी फोटॉन बॅचचे प्रमुख प्रा.भगत, प्रा.मोमीन व फेनोमेनॉल बॅचचे प्रमुख श्री.पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्राचार्य एस. एस. देशमुख व प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांचे सहकार्य लाभले.