प्रतिनिधी / वाशी
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती उद्धभवली असूनही शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. त्याबाबत वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून निवेदनाची दखल घेतली जात नाही. सरकारच्या वेळकाढूपनाच्या धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी (दि.६) तहसीलवर स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तालुक्यात पावसाने मोठा खंड दिला असून,याचा विपरित परिणाम तालुक्यातील शेतीवर झाला आहे. खरिपाची पिके संकटात सापडली असून बहुतांशी भागातील पिके करपली आहेत. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाच्या क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, पीक विमा मंजूर करा,अनुदान वाटप करा,चारा छावणी सुरू करा यासह विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार नरसिंग जाधव यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष ऍड.वसंत जगताप, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन भारती, तालुका संघटक संजय कवडे, शिवाजी उंदरे, दादासाहेब चेडे, राम घुले, बाळासाहेब माळी , नानासाहेब उंदरे, चंद्रकांत उंदरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.