प्रतिनिधी / धाराशिव
इयत्ता पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आळणी शाळेत सजविलेल्या ट्रॅक्टरमधून वाजत गाजत, ढोल ताशा लेझीम झाँज व टाळ मृदंग पथकांसोबत मिरवणूक काढण्यात आली.प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजविले होते. लेझिम, ढोलताशांच्या व बँडच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना वही पेन नवीन गणवेश व पाठ्यपुस्तके देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता.या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी देखील जय्यत तयारी केली होती. पहिल्याचं दिवशी भीतीने चिमुकल्यांचे रडणे आणि शिक्षकांचं समजावणे, त्यातचं मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा गजबजून गेल्याचं दिसून आलं.
शाळेचा पहिला दिवस असल्याने आम्ही खूप आनंदात आहोत अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे साहेब यांनी भेट देऊन शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या हस्ते पहिली मध्ये दाखल मुलांना मिष्टांन्न देण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद आणि गावचे सरपंच प्रमोद वीर उपसरपंच कृष्णा गाडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर लावंड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे उपाध्यक्ष श्रीमती अफसाना शेख माजी सरपंच संतोष बप्पा चौगुले मंडळ अधिकारी मुळीक मॅडम तलाठी रसाळ मॅडम ग्रामपंचायत सदस्य सौ संजीवनी पौळ श्री अक्षय कदम यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले,सूत्रसंचालन श्रीमती म्हेत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन डावखरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले..