आरंभ मराठी / धाराशिव
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दाळींब येथे घडलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात कामगारच दरोड्याचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून दोन आरोपींना अटक करून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी फिर्यादी हृषिकेश जाधव (रा. लातूर) हे मुरूम येथून माल उतरवून मिळालेली १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असताना दाळींब येथे सहा अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना व चालकाला मारहाण करून रोख रक्कम लुटली. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासाला लागले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ३१ मार्च रोजी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. आरोपी अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९, रा. कंटेकूर) हा मुरूम येथील उज्वला किराणा दुकानात कामगार होता. फिर्यादींकडे मोठी रोख रक्कम असल्याचे त्याने पाहिले होते.
त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना माहिती देऊन दरोड्याचा कट रचला. आरोपींनी मोटारसायकल व पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या सहाय्याने फिर्यादींचा पाठलाग करत दाळींब येथे त्यांना अडवून मारहाण करून रक्कम लुटली. या प्रकरणात अभिषेक कावडे व दत्ता व्यंकट जमादार (वय ३३, रा. कंटेकूर) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २० हजार रुपये रोख व दोन मोबाईल असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.








