बचत गटाच्या महिलांची फसवणूक करण्याचा प्रकार
आरंभ मराठी / कळंब
एका महिलेने आणि तिच्या पतीने बचत गटातील महिलांचे पैसे आणि सोने घेऊन त्यांना जादूटोण्याची भीती दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जादूटोणा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही आढळून आलेले आहे. परंतु तरीही पोलिसांनी या प्रकरणाला बेदखल करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.
कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवाशांनी गावातीलच सविता सचिन डिकले यांच्याविरोधात जादूटोणा केल्याचा आरोप केला आहे. बचत गटाच्या पैशाच्या प्रकरणात हा प्रकार उघडकीस आला असून, यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी गावातील सरपंच आणि बचत गटातील इतर महिलांनी कळंब पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी कायद्यानुसार संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
तांदुळवाडी गावात कुलस्वामिनी महिला बचत गट आहे. सविता डिकले या बचत गटाच्या सचिव आहेत. सविता सचिन डिकले यांनी घरोघरी जाऊन दवाखान्याचे कारण सांगून बचत गटातील इतर महिलांना हातऊसन्या पैशाची मागणी केली होती.
अनेक महिलांकडून त्यांनी लाखो रुपयांची हातउसणी रक्कम आणि सोने घेतल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. हातउसने घेतलेले पैसे आणि सोने मागण्यासाठी गेलेल्या महिलांना काळ्या जादूची भीती दाखवून त्यांच्यावर जादूटोणा करण्याची भीती दाखवून सविता डिकले यांनी घेतलेले पैसे आणि सोने परत देण्यास नकार देऊन महिलांची फसवणूक केली. तसेच ज्यांचे पैसे आणि सोने घेतले होते अशा महिलांच्या घरात हळद, कुंकु, सुया लावलेले लिंबु व राख टाकल्याचेही महिलांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये सविता यांचे पती सचिन पांडुरंग डिकले यांनी जादूटोण्याचे साहित्य टाकल्याचे दिसून आलेले आहे.
पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या अर्जावर सरपंच प्रणित शामराव डिकले यांच्यासह मधुमंजीली संदीप काळे, संयोगिता उत्रेश्वर पानढवळे, शिला चंद्रकांत डिकले, सविता श्रीराम काळे, अनुराधा पांडूरंग डिकले, सुवर्णा उत्रेश्वर डिकले यांच्या स्वाक्षरी आहेत. या प्रकरणी काही महिला त्यांच्या घरात टाकलेले लिंबू घेऊन पोलिसांसमोर कैफियत मांडत असताना पोलिसांनी मात्र त्या लिंबाचे शरबत करून प्या असा अजब सल्ला दिल्याचे महिलांनी सांगितले. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असताना पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने का घेतले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.