जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे बिबट्या दिसल्याची होती चर्चा, आता भूम तालुक्यात दहशत
प्रतिनिधी / वाशी
भूम तालुक्यातील ईट सर्कल मधील निपाणी -माळवाडी या परिसरात शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी तोंडात शिकार घेऊन जाताना बिबट्या आढळून आला असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वनविभागाने याची तत्काळ दखल घेतली असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा लावली जात आहे.
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे ४ बिबटे आढळून बिबटे दिसल्याची चर्चा मागील काही दिवसात होती. तसेच एक शेळी व एक वासराची शिकार केल्याची चर्चा होती. मात्र ईट परिसरात काही प्रत्यक्षदर्शीनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. ईट आणि जातेगावचा शिवार लगत असून जातेगाव येथून बिबट्यांनी आपला संचार ईट परिसरात वाढवला असू शकतो. तसेच निपाणी – माळवाडी या परिसरात तोंडात शिकार घेऊन जाताना बिबट्या आढळून आला असून तोंडात शिकार घेऊन जातानाचे फोटो समाजमाध्यामावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वन विभागाने माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.
दोन वर्षांपूर्वी आढळला होता बिबट्या
दोन वर्षांपूर्वी याच परिसरात बिबट्या दिसत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र काही दिवसात धाराशिव तालुक्यातील घाटंग्री शिवारात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे गावकऱ्यांचा दावा खरा की खोटा हे तपासण्यासाठी वन विभागाने यंत्रणा उभी करावी अशी मागणी होत आहे.