प्रतिनिधी / वाशी
तालुक्यातील एका गावातून नांदूरला शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढल्याची घटना बुधवारी (दि.१९) रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नांदूर (ता.केज) येथील चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनीरीक्षक के. डी.जगताप पिंक पथक (भुम) करत आहेत.
बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील एका गावातील मुली नांदूर (ता.केज) याठिकाणी शालेय शिक्षणासाठी जातात. शाळा सुटून घरी परतत असताना नांदूर येथील चार जणांनी या मुलींची छेड काढत त्यांचा विनयभंग केला. मुलींची आरडाओरड ऐकूण शेतात काम करत असलेले गावकरी धावून आले. यावेळी गावकऱ्यांनी एकाला पकडुन वाशी पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून चौघाविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यामुळे लहान खेड्यातून शालेय शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याची भावना पालकातून व्यक्त होत आहे.