प्रतिनिधी / वाशी
शहरवासियांच्या वतीने जय हनुमान तालीम मंडळाच्या पुढाकारातून वाशी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचे प्रथम बक्षीस सुनील जाधव यांनी पटकावले. शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पंडितराव चेडे यांच्या वतीने 15 हजार रुपयांचे हे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दरवर्षी दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी ही भव्य कुस्ती सस्पर्धा आयोजित करण्यात येते.
परंतु यावर्षी भाऊबीजेच्या दिवशी शहरात मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे आयोजन केल्यामुळे तालीम मंडळाकडून कुस्ती स्पर्धेच्या नियोजनात बदल करून रविवारी (दि.१७) स्पर्धा आयोजित करण्यात आली.
तहसील रोडवरील मैदानात दुपारी चार वाजता स्पर्धा सुरू करण्यात आल्या. यावेळी तेरखेडा, बार्शी, आगळगाव, पाटोदा, जामखेड , कुर्डूवाडी यासह विविध ठिकाणच्या मल्लानी सहभाग घेतला होता. झालेल्या या स्पर्धेत पैलवानांनी एकमेकास प्रचंड झुंज देत रोमहर्षक कुस्त्या पार पाडल्या.
स्पर्धेतील अंतिम लढत सुनील जाधव व पृथ्वीराज वणवे यांच्यात झाली. यामध्ये सुनील जाधव याने बाजी मारली. शिवशक्ती शेतकरी साखर कारखान्याचे संस्थापक पंडितराव चेडे यांच्या वतीने विजेत्याला पंधरा हजार रूपये बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेत उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, नगरसेवक किशोर भांडवले, अभय उंदरे यांच्याकडून प्रत्येकी आकरा हजार रुपये बक्षीसासाठी कुस्ती लावण्यात आल्या होत्या.
या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यासह शहरातून कुस्ती प्रेमी येथे गर्दी करत असतात. मंडळाचे अध्यक्ष भारत मोळवणे, नागनाथ नाईकवाड़ी, विकास मो, शिवाजी सांडसे, छगनराव मोळवणे, शंकरराव लोंढे, गोविंद चव्हाण, तात्यासाहेब बहिर यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर सदाशिवराव जगताप,बलिराम कवडे, नानासाहेब उंदरे, बलिराम जगताप यांनी विजयी मल्लाना बक्षीसे देत खजिनदार म्हणून काम पाहिले. यावेळी बाहेर गावाहून आलेल्या आखाड्यांच्या वस्तादांचा तालीम मंडळाचा वतीने सत्कार करण्यात आले. कुस्त्यांचे समालोचन शिवशंकर राउत यांनी केले.