प्रतिनिधी / वाशी
इंग्रजांच्या काळात व्यवस्थेच्या विरोधात बोलणे अवघड होते. त्यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू करून समाजसेवेचे मोठे काम केले. सामाजिक हिताचा विचार करून प्रतिकूल परिस्थितीतही वास्तव मांडून निडरपणे लढणारे पत्रकार हे “कलम के सिपाही” असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण गंभीरे यांनी केले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त गुरूवारी (दि.११) आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
माझ्याकडे महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नवीनच जबाबदारी आलेली असून, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील सर्व घटक आणि पत्रकार यांच्या सहकार्याने महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि क्रिडा क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा डॉ. गंभिरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या हितासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाविद्यालयाच्या सकारात्मक बाबींचे वार्तांकन कुठलीही अपेक्षा न ठेवता पत्रकार करत असल्याचे सांगितले. यावेळी मुकुंद चेडे, गौतम चेडे, शोएब काझी, नवनाथ टकले, एम.आय. मुजावर, शिवाजी गवारे, सचिन कोरडे, विलास गपाट, दादासाहेब लगाडे यांच्यासह तालुक्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. आनंद करडे यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनुक्रमे प्रा. महादेव उंदरे, प्रा. बालाजी देवकाते यांनी केले.