जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
प्रतिनिधी / भूम
सक्षम नारी उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गावातील मुलीच्या जन्मानंतर व लग्नासाठी ‘लेक लाडकी माझ्या गावची’ व ‘कन्यारत्न’ योजनांची संकल्पना भूम तालुक्यातील वालवड ग्रामपंचायतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत 1 जानेवारीपासून (2024) जन्मलेल्या मुलींना 3 हजार रुपये तर मुलींच्या लग्नासाठी 7 हजार रुपये देण्यात येणार आहे.
नाविन्यपूर्ण योजनांसाठी वालवड ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात.विविध क्षेत्रात यशस्वी यशस्वी झालेल्या महिलांचा सन्मान केला जातो. तसेच गावातील आंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना प्रत्येकवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना साड्या भेट दिल्या जातात. त्याप्रमाणे आता गावामध्ये मुलीच्या जन्मानंतर स्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने ‘कन्यारत्न’ योजने अंतर्गत ३ हजार रुपये मिळणार आहेत तर मुलीच्या लग्नाला मदत म्हणून ‘लेक लाडकी माझ्या गावची’ या योजनेंतर्गत ७ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सरपंच उपसरपंच देणार मानधन
या योजनांसाठी सरपंच–उपसरपंच यांचे मानधन व ग्रामपंचायतच्या निधीतून याची तरतूद करण्यात आली आहे. या योजना १ जानेवारी २०२४ लागू करण्यात आल्या आहेत.
गावचे रहिवाशी, १८ वर्ष वय व संमतीने विवाह आवश्यक
या योजनांच्या लाभासाठी मुलगीचे आई वडील गावचे रहिवाशी असणे बंधनकारक असून मुलीचे लग्नासाठी वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. मुलीचा विवाह आईवडिलांच्या मान्यतेने होणे आवश्यक आहे.
मुलगा मुलगी भेदभाव नको म्हणून योजना
समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे व मुलीच्या लग्नासाठी मदत व्हावी, या उद्देशाने योजना ग्रामपंचायतीने सुरु केल्या आहेत.
श्रीमती प्रभावती देवळकर, सरपंच, वालवड
मानधनातून उपक्रम राबविणार
मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी,त्यांच्या लग्नाला हातभार लागावा महिला सबलीकरणाच्या उद्देशाने आमच्या मानधनातून व ग्रामपंचायत निधीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कु.कृष्ण मोहिते, उपसरपंच वालवड,
प्रेरणादायी उपक्रम
मुलीच्या जन्माचे स्वागत व लग्नासाठी मदत अनोख्या पद्धतीने ग्रामपंचायत करीत आहे. वास्तवातील महिला सबलीकरणाचे पाउल ग्रामपंचायतीने उचलले आहे.निश्चितपणे आगामी काळात हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरेल.
एम.व्ही.गायकवाड, ग्रामविकास अधिकारी वालवड,
कृतिशील निर्णय
ग्रामपंचायतीचा उपक्रम कौतुकास्पद असून, खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा कृतीशील निर्णय आम्हा सर्वांना खूप आवडला आहे.
जयश्री वालवडकर, गृहिणी, वालवड