उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बोगस खते,बियाणे विकणारे आता गजाआड जातील
विशेष प्रतिनिधी / मुंबई
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाज सुरू झाल्यावर अपुरा पाऊस आणि संकटात आलेला शेतकरी या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली ती फेटाळून लावण्यात आल्यावर विरोधकांनी सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करून दिल्यावर काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी कामकाजावर आक्षेप घेत राज्यात पावसाच्या अभावी शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून काही ठिकाणी खते,बियाणे यामुळे तो संकटात आहे,त्यामुळे या प्रश्नावर सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी केली मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदर प्रस्ताव नाकारल्याने संतप्त झालेल्या विरोधी पक्षाने सभात्याग केला.
त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर टीका केली.सभागृहात विषय मांडण्यासाठी अनेक आयुधे उपलब्ध असताना त्याचा वापर न करता याना फक्त गोंधळ करायचा असल्याची टीका केली. राज्यात पाऊस आणि शेतीची अवस्था यावर सरकार लक्ष ठेवून आहे,शेतकऱ्यांना यापुढे खते आणि बियाणे देऊन कुणीही विक्रेता फसवू शकणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करीत आहोत,त्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना आधी जामीन मिळत होता आता हा गुन्हा अजामीनपात्र करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
काही वेळाने विरोधक पुन्हा सभागृहात आल्यावर शोकप्रस्ताव पारित झाल्यावर विधानसभा कामकाज दिवस भरासाठी तहकूब करण्यात आले.