प्रतिनिधी / वाशी
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरात स्वच्छता सेवा उपक्रमा अंतर्गत “एक तास एक साथ हा कार्यक्रम नगरपंचायतच्या वतीने रविवारी (दि.१) सकाळी १० वाजता शहरातील सर्व १७ प्रभागात आयोजित करण्यात आला. या उपक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ८० वर्षीय आजींनी देखील या उपक्रमात सहभागी होत शहर स्वच्छ्ता केली.
स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून, ही एक चळवळ बनण्याची गरज आहे. त्यानुषंगाने शहरवासीयांच्या सहभाग घेत स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत “एक तास एक साथ” हा कार्यक्रम नगरपंचायतच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी शहरातील सर्वच प्रभागातील शाळा, मंदिरे, रस्ते, नाल्या यासह सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवक, कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान करत कार्यक्रम यशस्वी केला.
या उक्रमाअंतर्गत शहरातील ज्या प्रभागातील स्वच्छता चांगली असेल अशा तीन प्रभागांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अशी निवड करण्यात येणार असून विजेत्या प्रभागाना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा विजया गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे , मुख्याधिकारी गिरीष पंडीत, गटनेते नागनाथ नाईकवाडी यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी होत शहरात स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगत शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.