१०० ते २०० ची वसुली, प्रशासनाची डोळेझाक कशासाठी?
प्रतिनिधी / वाशी
सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून, लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुदान मिळण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांना ऑनलाईन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. महा ई सेवा व आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र यात शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे.
पेरणीच्या काळात लवकर रक्कम मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणीकरण करून घेण्याची धावपळ सुरू आहे. याचाच गैरफायदा केंद्र चालकांकडून घेतला जात आहे. प्रति प्रमाणीकरण १०० ते २०० रुपयांपर्यंतची रक्कम केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे.
पीक विमा भरण्यासाठीही शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दाद मागायची कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी केंद्रचालक मागेल तेवढे पैसे शेतकरी निमूटपणे देत आहेत. त्यामुळे केंद्रचालकांवर अंकुश ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शासकीय प्रमाणपत्रासाठी ही विद्यार्थी पालकांची लुटमार शैक्षणिक व इतर कामासाठी लागणारी रहिवाशी, जात, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न, इडब्लूएस विविध शासकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी महा ई सेवा व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना शासनाने ठराविक रक्कम ठरवून दिलेल्या आहेत. मात्र केंद्रचालक प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांकडून अवाजवी रक्कम वसूल करत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा धाकच नसल्याचे आढळून येत आहे.
कोड एकाचा, वापरतोय दुसराच
महा ई सेवा, आपले सरकार सेवा केंद्र आणि csc सेंटरचे कोड अनियंत्रितपणे चालवले जात आहेत. केंद्र चालकाचे कोड ज्याच्या नावावर आहेत,त्यांनी दुसऱ्यांना वापरायला दिले आहेत. त्यामुळे केंद्रावर अनियमितता आली असल्याची चर्चा सुरू आहे.
चौकशी करा- केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. केंद्र चालकांच्या कोड मध्ये अनियमितता असून याची निष्पक्ष चौकशी करावी. याबाबत तहसीलदार वाशी व मुख्यमंत्री यांचेकडेही तक्रार देण्यात आली आहे.
राजेश्वर कवडे, तक्रारदार