प्रतिनिधी / धाराशिव
तालुक्यातील वाणेवाडीच्या वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेत एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीला आली असून,या प्रकरणात पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष उंबरे महाराज यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला असून, पोलीस तपास सुरू आहे.
वाणेवाडी येथील शिवारात मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था असून, या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांची ख्याती सर्वदूर आहे. तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी येथील ब्रह्ममहोत्सवात येथील मुलांना आमंत्रित केले जाते. मुलांना शिक्षण देणाऱ्या या संस्थेत दहावीच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने उंबरे महाराज यांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी केली जात आहे.