पेरणी रखडली, शेतकरी हतबल,
स्वराज्य संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / लोहारा
हंगामात एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे लोहारा – उमरगा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीसाठी खरेदी केलेल्या कृषी निविष्ठा पडून असून, पेरणी होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे दुष्काळ जाहीर करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी लोहारा तालुका स्वराज्य संघटनेच्या वतीने उमरगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस न पडल्यामुळे जनावरांचा चारा नसल्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्याची मागणी ही करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षीचा खरीप व रब्बीचा राहिलेला पिक विमा त्वरित देण्यात यावा. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, वाळलेल्या उसाचे पंचनामे करून मदत देण्यात यावी व सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत ही देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील, कार्याध्यक्ष युवराज साळुंके, सचिव बळी गोरे, संजय मुरटे, शेतकरी बालाजी मुळे, महेश सुतार, राजाभाऊ मुळे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.