आरंभ मराठी / धाराशिव
राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची उमरगा तसेच तुळजापूर येथे जाहीर सभा होणार असून, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते धाराशिव शहरात मुक्कामी येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यात येऊन शिवसंकल्प सभा घेतली होती तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असून, शुक्रवारी लातूर विमानतळावरून ते औसा, लामजनामार्गे उमरगा तसेच लोहारामार्गे तुळजापूर येथे सभा घेणार आहेत. उमरगा व तुळजापूर येथे जाहीर सभा करून ते सायंकाळी धाराशिव शहरातील सर्किट हाऊस येथे मुक्कामासाठी येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच धाराशिव जिल्ह्यात येत असून, ते काय बोलणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
असा असेल ठाकरेंचा दौरा
उद्धव ठाकरे १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता मुंबई ते लातुर खाजगी विमानाने (VT-VSS) प्रवास करणार आहेत. त्यांचा प्रवास कॉपोरेट एव्हिएशन टर्मिनल, गेट क्रमांक ८, जुना विमानतळ, मुंबई येथून सकाळी खाजगी विमानाने सुरू होईल. सकाळी १२:०० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. लातूर विमानतळावर उत्तरल्यानंतर ते खाजगी कारमधून पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना होतील.दुपारी औसा सभा,त्यानंतर लामजना चौक येथे स्वागत,किल्लारी येथे स्वागत,त्यानंतर उमरगा येथे सभा, लोहरामार्गे तुळजापूर शहरात आगमन,तुळजाभवानी मातेचे दर्शन आणि त्यानंतर तुळजापूर येथे सभा होईल. सायंकाळी ते धाराशिव शहरात मुक्कामी येतील.