आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने शनिवारी रात्री उशिरा या संदर्भातील यादी जाहीर केली असून, त्यात तुळजापूरमध्ये पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
काही दिवसांपासून तुळजापूरच्या जागेवर खलबतं सुरू होती. या जागेचा प्रश्न सुटत नव्हता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मात्र पक्षाने त्यांना यावेळी संधी नाकारली आहे. मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने मधुकरराव चव्हाण यांच्यासमोर काँग्रेसमधून उमेदवारीचा मोठा अडथळा ठरला.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते.मात्र त्यांनाही संधी मिळाली नाही. शिवसेना उबाठा गटाने ही जागा आपल्या पक्षाला सोडावी,यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र चार दिवसांपूर्वी शिवसेनेला आपला या जागेवरील दावा सोडावा लागला.अखेर शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसची यादी जाहीर झाली असून, त्यात तुळजापूर विधानसभेसाठी जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
आता अशोक जगदाळे आणि मधुकर चव्हाण यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक जगदाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार मधुकर चव्हाण यांची मते घेऊन त्यांचा पराभव केला होता.