प्रतिनिधी / तुळजापूर
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ऑक्टोबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी बुधवारी तुळजापूरमध्ये आढावा बैठक घेतली. त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कारण शहरात वेगवेगळ्या भागात प्रचंड अस्वच्छता असून, अतिक्रमण ही वाढले आहेत.त्यामुळे दररोज चार ते पाच कारवाया करत अतिक्रमण हटविण्याच्या सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या तसेच अस्वच्छतेबद्दल अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला.
तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर तयारी सुरू होत आहे. त्यासाठी बुधवारी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार संतोष पाटील, पोलीस निरीक्षक घाडगे, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार आदी उपस्थित होते.
शहरात फिरून केली पाहणी
घाटशिळ रोड वाहनतळ येथील दर्शन मंडप, शहरातील विविध ठिकाणी करावयाची बॅरीकेटींग आदींची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नवरात्र महोत्सवात नियोजनासाठी कर्नाटक व महाराष्ट्राच्या एस.टी. महामंडळाला खाजगी जागा भाड्याने घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डाॅ.ओंबासे यांनी यावेळी दिले. त्यांनी स्वतः शहरातील विविध ठिकाणी जाऊन भेटी दिल्या व पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावर खड्डे बुजवणे, महावितरणला नवरात्रात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. नगर पालिका, आरोग्य विभाग, मंदिर संस्थानला त्यांचा जबाबदाऱ्या पार पाडण्याचा सुचना देण्यात आल्या. बैठकीला महंत, पुजारी मंडळाचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे अधिकारी -कर्मचारी, सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.