तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक श्रद्धेचं, भक्तीचं, आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक. इथे केवळ देवीची पूजा होत नाही, तर हजारो लोकांचा चरितार्थ मंदिराशी आणि यात्रेशी जोडलेला आहे. मी स्वतः तुळजापूरची लेक असून, अलीकडे प्रसारित होत असलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया वाचून मन प्रचंड व्यथित झालं आहे.त्यासंदर्भात माझं माध्यमांना आवाहन आहे की सत्य शोधा, तुळजापूरची बदनामी करू नका.
-आश्लेषा बाळासाहेब हंगरगेकर
–
आश्लेषा हंगरगेकर म्हणतात…
अलीकडील प्रकरणात तुळजापूरमधून ड्रग्ज पकडण्यात आले आणि त्यासंदर्भात काहीजणांना अटकही झाली. हे गंभीर प्रकरण नक्कीच आहे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमचीही इच्छा आहे. पण बातमी मांडताना आणि चर्चेला वळण देताना, केवळ पुजारी हा शब्द वारंवार वापरला गेला आणि त्यामुळे संपूर्ण पुजारी वर्गावर संशय आणि बदनामीचा कलंक लावला गेला–हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मुद्दा हाच आहे – गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, किंवा व्यवसायाचा असो. मग ‘पुजारी’ असो वा कोणी दुसरा –गुन्ह्याचं समर्थन कोणीच करत नाही. पण एखाद्याच्या चुकीसाठी संपूर्ण समुदायाला दोष देणं हीच समाजाची आणि माध्यमांची सर्वात मोठी चूक आहे.
हे समजून घ्या – तुळजापूरमधील बहुसंख्य पुजारी हे पिढ्यानपिढ्या निष्ठेने देवीची सेवा करत आलेले आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह, आणि गावातील लोकांची आस्था या मंदिरावर आधारित आहे. एक चुकीची बातमी किंवा चुकीचा हेडलाइन त्यांच्या जीवनावर परिणाम करत आहे.
याच प्रकरणात पुजारी बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ड्रग माफियांना शोधून काढा आणि कठोर शिक्षा करा अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी लाक्षणिक उपोषण केलं, निवेदने दिली, आणि स्पष्ट सांगितलं की देवीच्या नावे किंवा मंदिराच्या नावाखाली कोणीही गुन्हे करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
पण दुर्दैवाने हे सकारात्मक पाऊल कुठल्याही प्रमुख न्यूज चॅनेलवर दाखवलं जात नाही. बातम्यांमध्ये केवळ ‘सनसनाटी’ दाखवून TRP मिळवायचा प्रयत्न केला जातो, पण पुजाऱ्यांनी केलेल्या शांततामय, कायदेशीर मार्गाने लढ्याची नोंदच घेतली जात नाही.
माध्यमांना नम्र विनंती आहे..
1. या ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज तुळजापूरमध्ये पोहोचलेच कसे? याचा शोध घ्या.
– हे पदार्थ तुळजापूरपर्यंत येताना अनेक सुरक्षा चौक्या, पोलिस तपासण्या पार करत आले. मग तिथे कोणीच का सापडला नाही ?
– ट्रान्सपोर्टचा मागोवा कोण घेतोय? ते वाहून आणणारे कोण होते? त्यांच्याविरुद्ध कारवाई का झाली नाही?
इतकं मोठं ड्रग्जचं जाळं कोण चालवत होतं?
🔸 या सगळ्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पुजाऱ्यांचं नाव घेत संपूर्ण मंदिर व्यवस्थेची बदनामी का केली जात आहे?
2. “तुळजापूर म्हणजे ड्रग्जचं अड्डा” अशा बातम्यांनी संपूर्ण गावाला बदनाम केलं जातंय.
– हे गाव केवळ मंदिरापुरतं मर्यादित नाही, तर इथं शिक्षण, सामाजिक कार्य, महिला स्वावलंबन, आणि पर्यटनाशी संबंधित अनेक उपक्रम सुरु आहेत.
– अशा बातम्यांनी इथल्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो.
3. TRP आणि सनसनाटीसाठी पुजाऱ्यांवर टीका करणं थांबवा.
– सोशल मीडियावर काहींनी इतपत म्हटलं की पुजारी म्हणजे आता ड्रग्ज पेडलरच झालेत!– हे केवळ अपमानजनक नाही, तर अत्यंत हानीकारक आहे.
– एक समुदाय म्हणून पुजारी वर्ग समाजसेवेसाठी, भक्तसेवेसाठी काम करत आलेला आहे.
-केवळ सनसनाटी बातम्यांसाठी TRP मिळवण्यासाठी एका पवित्र स्थळाची आणि संपूर्ण समाजाची बदनामी करणे योग्य आहे का?
-जे दोषी आहेत, त्यांना शिक्षा हवीच. पण निष्पाप पुजारी आणि सामान्य लोकांचे काय?
आपल्या शब्दांनी, आपल्या पोस्ट्सनी आणि बातम्यांनी संपूर्ण भागाची प्रतिष्ठा धोक्यात येते.
तुळजापूरवर आणि त्याच्याशी जोडलेल्या गावांवर हजारो लोकांचं जीवन अवलंबून आहे. फक्त दोषी व्यक्तींवर लक्ष केंद्रित करा – त्यांचा व्यवसाय किंवा पार्श्वभूमी नव्हे.
तुळजापूर आणि परिसरातील अनेक गावे मंदिर व यात्रेवर अवलंबून आहेत. या यात्रेमुळे हजारो हातांना काम मिळतं – मग ते फेरीवाले असोत, लघुउद्योजक, हॉटेल व्यवसायिक किंवा इतर. एका चुकीच्या मथळ्यामुळे संपूर्ण तुळजापूर आणि परिसराची प्रतिमा धूसर होते.
सत्य सांगा, सनसनाटी नव्हे.
दोषीला शिक्षा मिळावी, पण निष्पापांचा सन्मान राखला जावा.
तुळजाभवानीच्या नावाने, न्याय आणि संयम राखा.
– एक तुळजापूरची लेक,
जी आपल्या गावाचा आणि देवीच्या मंदिराचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी सजग आहे.
– आश्लेषा बाळासाहेब हंगरगेकर,