प्रतिनिधी / तुळजापूर
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात तब्बल दहा पटीने करण्यात आलेली दरवाढ तुळजाभवानी मंदिर संस्थाने स्थगित करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. पुजारी वर्गातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मंदिर संस्थांनने आपला निर्णय स्थगित केला आहे. मात्र पुजारी वर्गाने हा निर्णय स्थगित न करता मागेच घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.१०) होणारी अभिषेक शुल्कातील दरवाढ आता टळली आहे.
पुजाऱ्यांचा तिव्र विरोधानंतर मंदिर संस्थानने अभिषेक पुजेच्या शुल्कात करण्यात आलेल्या दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली तसेच यावेळी मंदिर संस्थानने विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शनासाठी प्रती व्यक्ती २०० रूपये शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही स्थगिती दिली आहे. तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजेचा शुल्कात तब्बल दहा पट दरवाढ करत ५० रूपया वरून ५०० रूपये करण्यात आल्याने पुजारी वर्गातून कमालीचा विरोध झाला होता. पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डाॅ.सचिन ओंबासे यांची भेट घेऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. अखेर मंदिर संस्थानने अभिषेक पुजेची शुल्कवाढ तसेच विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शन पाससाठी शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र दरवाढीचा निर्णयाला स्थगिती नाही तर दरवाढीचा निर्णयच मागे घेण्याची मागणी पुजारी वर्गातून करण्यात येत आहे.
लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे म्हणाले, मंदिर संस्थानने अभिषेक पुजेच्या शुल्कात करण्यात आलेल्या दहा पट दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच यावेळी विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शनसाठी प्रती व्यक्ती २०० रूपये शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही स्थगिती देण्यात आली आहे.